फक्त आजचा दिवस – १ – तुम्हाला व्यसन सोडावेसे वाटते का?

नमस्कार,

संशोधनाच्या दरम्यान ठाणे फॉलोअप ग्रुपला जात होतो. त्यावेळी नवीन आलेल्या रुग्णांना एकच एक प्रश्न वारंवार विचारला जात असे. तो प्रश्न म्हणजे “तुम्हाला दारु सोडायची आहे का?” ज्यांना व्यसनाबद्दल फारशी माहिती नाही त्यांना हा प्रश्न चमत्कारिक वाटण्याची शक्यता आहे. माणसाने व्यसनामुळे आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करून घेतला आहे. त्याच्या कुटूंबियांनी त्याला ग्रूपला आणले आहे. ती मंडळी मुक्तांगणला अ‍ॅडमिशनसाठी चौकशी करीत आहेत. असे असताना “तुम्हाला दारु सोडायची आहे का? ” हा काय प्रश्न झाला? त्या माणसाला दारु नक्कीच सोडायची असणार. त्यासाठीच तर तो येथे आला आहे.

पण या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या नसतात. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात तुमच्या सार्‍या व्यसनमुक्तीचे भविष्यही दडलेले असते असे आज इतक्या वर्षानंतर मी निश्चितपणे सांगु शकतो. मुक्तांगणला उपचारांसाठी येणारी सर्वच माणसे स्वत:च्या मनाने आलेली नसतात. त्यातील अनेकांना आपल्याला येथे मनाविरुद्ध आणले आहे असे वाटत असते. त्यातली काही माणसे घरच्यांवर राग धरुन असतात. तर काहींना आपण व्यसनी झालो आहोत हेच मान्य नसते.

आपण व्यसनी झालो आहोत आणि आपल्याला उपचारांची गरज आहे हे मनापासून मान्य करणे ही व्यसनमुक्तीपथावरची पहिली पायरी आहे. हे मान्य करताना कसे आणि किती अडथळे येतात आणि ते आपणच कसे आणलेले असतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

प्रश्नाचे महत्व

हा प्रश्न औपचारिक नाही. त्याच्यामागे एक अतिशय महत्वाचा विचार आहे. तुम्हाला व्यसनमुक्त व्हायचं आहे या प्रश्नाचं जर प्रामाणिक उत्तर मिळालं तर त्यात व्यसनमुक्तीच्या उपचारामधलं यश दडलेलं आहे असं लक्षात येईल. बहुसंख्य माणसं या प्रश्नाला उत्तर द्यायला बिचकतात. म्हणजे व्यसनामुळे कितीही नुकसान झाले असो, आयुष्याचा सर्वनाश झालेला असो, व्यसनी माणसाच्या मेंदूवर व्यसन स्वार झालेले असते त्यामुळे त्याला व्यसन थांबवणे नको वाटते. फार तर मर्यादेत राहायला तो तयार झालेला असतो. अर्थात ते देखील मनापासून असेलच असे सांगता येत नाही.

जेव्हा उपचारकेंद्रात किंवा समुपदेशन करताना हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ही एक प्रकारची चाचपणी असते. उपचारांसाठी समोर आणलेला माणुस उपचार घेण्यासाठी कितपत तयार आहे हे पाहणे महत्वाचे असते. अनेकदा व्यसनी लोकांना सक्तीने उपचार घेण्यास भाग पाडले जाते. अशावेळी काही जण घरच्यांवर राग धरून असतात. आणि मनापासून उपचारात सहभागी होत नाहीत. एक तर संपूर्ण असहकार पुकारतात किंवा उपचारांमध्ये भाग घेतल्याचं नाटक करतात. म्हणून जे निरनिराळे प्रश्न सुरुवातीला विचारले जातात त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न असतो कारण त्याच्या उत्तरावर व्यसनमुक्तीच्या उपचारांचं यश अवलंबून असतं.

जबाबदारी कुणाची?

एक आणखी महत्वाची गोष्ट या प्रश्नाच्या उत्तरात कळण्याची शक्यता असते. आपल्या व्यसनाची जबाबदारी हा माणुस स्वतः घेतो आहे की नाही. व्यसन सोडायचंय पण कुणावर तरी उपकार म्हणून, किंवा घरचे सक्ती करताहेत म्हणून असेल तर ती व्यसनमुक्ती टिकणे अवघड असते. कारण परिस्थिती प्रतिकूल झाली की ही माणसे पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता वाढते. व्यसन जर स्वतःला व्यसनाच्या गुलामागिरीतून बाहेर पडायचं म्हणून सोडायचं असेल तर माणुस व्यसनमुक्तीसाठी जास्तीतजास्त आणि प्रामाणिक प्रयत्न करेल असं मला वाटतं. मनाचा प्रामाणिकपणा हा व्यसनमुक्तीचा कणा आहे असं म्हणता येईल.

काहीवेळा माणसे व्यसनामुळे भयंकर नुकसान झालेले असते आणि त्यामुळे नाईलाज म्हणून येतात. काहींना कामावर नोटीस मिळालेली असते. काहींची बायकामुले सोडून जाण्याच्या मार्गावर असतात. अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली असते. काहींना अपघात झाल्यामुळे ती माणसे घाबरलेली असतात तर काहीजण व्यसनामुळे आजारी पडलेले असतात. कुठल्याही कारणाने का होईना माणुस उपचार घ्यायला तयार झाला ही चांगलीच गोष्ट असते. मात्र व्यसनामुळे फारसं नुकसान झालेलं नसताना आधीच धोका ओळखून, जागृत होऊन व्यसन सोडायला आलेली माणसं कमी असतात आणि माझ्या मते ही आदर्श मनोभुमिका असते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...