फक्त आजचा दिवस – १ ते ४

फक्त आजचा दिवस – १ – तुम्हाला व्यसन सोडावेसे वाटते का?

नमस्कार

संशोधनाच्या दरम्यान ठाणे फॉलोअप ग्रुपला जात होतो. त्यावेळी नवीन आलेल्या रुग्णांना एकच एक प्रश्न वारंवार विचारला जात असे. तो प्रश्न म्हणजे “तुम्हाला दारु सोडायची आहे का?” ज्यांना व्यसनाबद्दल फारशी माहिती नाही त्यांना हा प्रश्न चमत्कारिक वाटण्याची शक्यता आहे. माणसाने व्यसनामुळे आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करून घेतला आहे. त्याच्या कुटूंबियांनी त्याला ग्रूपला आणले आहे. ती मंडळी मुक्तांगणला अ‍ॅडमिशनसाठी चौकशी करीत आहेत. असे असताना “तुम्हाला दारु सोडायची आहे का? ” हा काय प्रश्न झाला? त्या माणसाला दारु नक्कीच सोडायची असणार. त्यासाठीच तर तो येथे आला आहे.

पण या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या नसतात. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात तुमच्या सार्‍या व्यसनमुक्तीचे भविष्यही दडलेले असते असे आज इतक्या वर्षानंतर मी निश्चितपणे सांगु शकतो. मुक्तांगणला उपचारांसाठी येणारी सर्वच माणसे स्वत:च्या मनाने आलेली नसतात. त्यातील अनेकांना आपल्याला येथे मनाविरुद्ध आणले आहे असे वाटत असते. त्यातली काही माणसे घरच्यांवर राग धरुन असतात. तर काहींना आपण व्यसनी झालो आहोत हेच मान्य नसते.

आपण व्यसनी झालो आहोत आणि आपल्याला उपचारांची गरज आहे हे मनापासून मान्य करणे ही व्यसनमुक्तीपथावरची पहिली पायरी आहे.

आपला
अतुल ठाकुर
१ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.


फक्त आजचा दिवस – २ – मला व्यसन नाहीच

नमस्कार

पाठपुराव्याला काही नवीन मंडळी येतात. त्यांच्या चेहर्‍यावर काळजी असतेच आणि असंख्य शंकाही असतात. आणि ते साहजिकच आहे. व्यसनी माणूस मात्र बिनधास्त असतो कारण तो डिनायलमध्ये असतो. त्याला एकच काळजी असते की आता ही मंडळी माझ्यात आणि आपल्या प्रिय दारुमध्ये कुठला अडथळा आणताहेत याची. आपण व्यसनी नाहीच याची त्याला एकशेएक टक्के खात्री असते. यावर घरच्यांशी, चांगल्या मित्रांशी अनेक वादविवाद झालेले असतात. आणि या गैरसमजाचे कारण तूलना हे असते.

मी अमक्यासारखा पडत नाही. मी तमक्यासारखा शिव्या देत नाही मग मी व्यसनी कसा? मला उपचारांची गरज नाही ही या माणसांची समजूत असते. इतकेच नव्हे तर घरच्यांनाच उपचारांची गरज आहे असे म्हणण्यापर्यंत काही महाभागांची मजल जाते.

या डिनायलच्या मूळाशी काही भ्रामक समज असतात. तुम्ही स्वतःच्या पैशाची पिता त्यामुळे इतर कुणीही बोलण्याचा तुम्हाला हक्क नसतो हा एक गोड गैरसमज आहे. कारण तुम्ही स्वतःच्या पैशाची जरी पित असला तरी त्या पिण्यामुळे जो त्रास तुम्ही देता तो इतरांना होत असतो. आपण आपल्या समाजात निर्वात पोकळीत राहात नाही. आपण कुणावर तरी अवलंबून असतो आणि आपल्यावर कुणीतरी अवलंबुन असते. त्यामुळे “माझा मी’ ही भाषा व्यसनाच्या बाबतीत तरी अगदी चूकीची ठरते.

आपला
अतुल ठाकुर
२ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.


फक्त आजचा दिवस – ३ – मला सांगणारे तुम्ही कोण?

नमस्कार

अनेकदा पाहिलंय की व्यसनीव्यक्तीच्या नाकावर अहंकार असतो आणि व्यसनी व्यक्ती अनेक गैरसमजांचे पिंजरे अंगावर बाळगत असते. व्यसनी व्यक्ती जर घरातील कमवती व्यक्ती असेल तर मग पैसा मी मिळवून आणतो ही अहंकाराची बाब ठरते आणि कुटुंबातल्या ज्या व्यक्ती कमवत नाहीत त्यांनी आपले सारे काही ऐकले पाहिजे आणि आपले कसेही वागणे सहन केले पाहिजे असे त्या व्यक्तीला वाटू लागते.

अशावेळी घर सांभाळण्यासारखे अतिशय महत्त्वाचे काम करणार्‍या सहचरीची फार कुचंबणा होऊ लागते. काही सहचरी कमवत्या माणसाने थोडी घेतली तर काय हरकत आहे असा विचार सुरुवातीला करतात आणि मग त्याचे रुपांतर व्यसनात झाले की पस्तावतात. मी पैसा कमवतो आणि माझ्या पैशाची पितो. तेव्हा मला दारु पिऊ नका हे सांगणारे तुम्ही कोण हा व्यसनी व्यक्तीचा प्रश्न असतो.

खरं तर व्यसनात पाऊल टाकले की चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, इष्ट अनिष्ट यांच्या सीमारेषा व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत धूसर ठरु लागतात. आणि एरवी प्रेमाची असलेली माणसे दारु सोडण्याबाबत बोलू लागली की त्याला ती शत्रू वाटू लागतात. व्यसन करताना आपली घसरगुंडी होत चालली आहे हे त्या व्यक्तीला कळत नसले तरी प्रेमाच्या माणसांना दिसत असते आणि त्या काळजीपोटीच ही माणसे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात.

अनेकदा हे प्रेमाचे उपदेश अळवावरच्या पाण्यासारखे वाहून जातात.

आपला
अतुल ठाकुर
३ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.


फक्त आजचा दिवस – ४ – त्या सोनेरी द्रवाचे आकर्षण

नमस्कार

मला एकदा व्यसनमुक्तीपथावर वाटचाल करणार्‍या समुपदेशकाने सांगितलं होतं की त्यांना पहिल्या घोटानंतर लगेच व्यसन लागलं नव्हतं. पण ग्लासामध्ये फेसाळणारा तो सोनेरी द्रव मात्र लक्षात राहिला होता. कळत नकळत त्याचं आकर्षण निर्माण झालं होतं. हे आकर्षण इतकं अनावर असतं की अनेक माणसे अगदी सुरुवातीपासून व्यसन करताना खोटे बोलण्याचा आश्रय घेऊ लागतात. आपल्या प्रेमाच्या माणसांशी व्यसन करण्यासाठी खोटे बोलण्याची इच्छा व्हावी यासारखी दु:खाची दुसरी गोष्ट नाही. पण व्यसनातल्या सुखाचं माणसाला जास्त आकर्षण वाटत असतं.

व्यसनाची एक सामाजिक बाजुही आहे. बहुतेक वेळा व्यसन हे गटातून सुरु होतं. मग तो मित्रमंडळींचा गट असेल, कामावरचे सहकारी असतील, पार्टी असेल. पण सर्वसाधारणपणे माणुस एकट्याने चला आज दारु पिऊन बघुयात असं म्हणून बारमध्ये शिरत नाही. या ग्रूप्समध्ये बसून एकदा प्यायला सुरुवात केली की यातला व्यसनी कोण होणार हे लगेच सांगता येत नाही. त्यातले काहीजण मर्यादेत पित राहतात आणि काहींना व्यसन लागते.

समाजात व्यसनापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी झटणारी अशी मंडळी कमी असतात ही एक आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण एकदा व्यसन लागलं की त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला मदत करणारे तथाकथित मित्र जास्त आढळतात. याला एक आर्थिक बाजू आहे. जूगाराचे व्यसन असलेल्याला कर्ज देणारी मंडळी भेटतात. आणि तो त्या चक्रात अडकत जातो.

आपला
अतुल ठाकुर
४ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...