फक्त आजचा दिवस – ५ ते ८

फक्त आजचा दिवस – ५ – व्यसन आणि पैशांचे गणित

नमस्कार

बहुतेक जण स्वतःच्याच पैशाने व्यसनाला सुरुवात करतात. अनेकदा असं ऐकलंय की काही व्यसनाचे पदार्थ हे सुरुवातीला अगदी स्वतात पुरवले जातात. त्यांची माणसाला सवय लागावी म्हणून. एकदा माणुस त्या विळख्यात अडकला की मग त्या व्यसनाची भरमसाठ किंमत वसूल केली जाते. व्यसन करण्याची जागा ठरलेली असेल तर ती व्यसनी व्यक्तीला जास्तीत जास्त आरामदायक वाटावी यासाठीही प्रयत्न केले जातात. जूगाराच्या जागी पिण्याचीही सोय करुन देण्याचे उदाहरण मला माहित आहे. थोडक्यात काय तर व्यसनाला आर्थिक गणित असतं आणि ते व्यसन पुरवणार्‍यांना जास्तीत जास्त फायदेशीर व्हावं यासाठी व्यसनी माणसाची चांगली बडदास्त राखली जाते.

अर्थात याला मर्यादा असतातच. व्यसनासाठी कर्ज देणारी माणसे तुम्ही ते कर्ज फेडू शकाल की नाही याचाही नीट अंदाज घेतच असतात. जोपर्यंत तुमची कर्ज फेडण्याची क्षमता आहे तो पर्यंत तुम्हाला कर्ज देणारी माणसे भेटतच जातात.  व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन तुम्ही आणि तुमचे कुटुंब देशोधडीला लागले आहे याची पर्वा कुणालाच नसते.

नोकरी, वाहन, राहते घर यावर हे कर्ज फेडणं अवलंबून असतं.  व्यसनीव्यक्तीसाठी व्यसन ही एकमेव प्राथमिकता असते आणि त्यासाठी पैशाची तजवीज करणे हा एकमेव विचार त्याच्या डोक्यात सकाळी उठल्यापासून सुरु असतो. अशावेळी तुम्हाला व्यसनापासून दूर करण्यापेक्षा तुम्हाला व्यसन पुरवून मजा पाहणारी काही विकृत माणसेही तुमच्या अवतिभवती मित्र म्हणून वावरत असतात.

एकंदरीतच व्यसन तुम्हाला आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, भावनिक अशा सर्व आघाड्यांवर पोखरण्यास सुरुवात करते.

आपला
अतुल ठाकुर
५ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे.


फक्त आजचा दिवस – ६ – डेरींगबाज बनवणारे व्यसन

नमस्कार

आपल्याकडे धाडसाच्या अनेक व्याख्या आहेत. सीमारेषेवर शत्रूला तोंड देणारे सैनिक धाडसीच असतात. अनेक शेयरींगमध्ये ऐकलंय की व्यसन केल्यावर धाडस येते. व्यसनातले धाडस हे पराक्रमाकडे नेणारे नसून तोंडाला काळे फासणारे असते हे येथे लक्षात घेतलेले बरे. याचा अर्थ हा की एरवी शुद्धीवर असताना लोकलाजेस्तव जे कृत्य करायला माणुस धजणार नाही ते कृत्य व्यसन केल्यावर माणुस बिनदिक्कतपणे करतो. व्यसनात लोकलाजेची भावना उरलेली नसते.

वेश्येकडे जाणारी माणसे आधी पोटात दारु ढकलतात असं ऐकलं आहे. दारु नसताना तेथे जाणं कठीण वाटतं पण एकदा दारु पोटात गेली की माणसाला चांगल्या वाईटाची तमा नसते. एरवी खोटे बोलणे माणसाला सहज वाटत नसेल पण व्यसनासाठी, पैसे मिळविण्यासाठी, व्यसन लपविण्यासाठी माणसे आपल्या प्रेमाच्या माणसांशीही बिनदिक्कत खोटे बोलतात.

माझ्यासमोर उच्चशिक्षित माणसाचे उदाहरण आहे. एरवी सभ्य भाषा वापरणारा हा मनुष्य व्यसनाच्या दरम्यान अतिशय गलिच्छ शिव्या देत असे. व्यसन सुटल्यावर पुन्हा त्या माणसाची भाषा सभ्य झाली. थोडक्यात काय तर व्यसन केल्यावर सारासारविचार करण्याची शक्ती माणसात राहात नाही. आणि त्यातच तो माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये करून बसतो. यालाच व्यसनातले डेयरींग म्हणतात.

आपला
अतुल ठाकुर
६ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.


फक्त आजचा दिवस – ७ – स्वभावदोषाबद्दल

नमस्कार

व्यसन आणि स्वभावदोष या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील आणि तरीही समाजात याबद्दलचे अज्ञान अगाध आहे. मुक्तांगणमध्ये व्यसनावर काम केले जाते हा सत्याचा एक भाग आहे. तेथे व्यसनाकडे तुम्हाला नेणार्‍या स्वभावदोषावर काम केले जाते हा सत्याचा दुसरा भाग आहे. जो स्वभाव तुम्हाला वारंवार व्यसनाकडे खेचून नेतो तोच बदलला की व्यसनमुक्ती सोपी होते हे तत्त्व त्यामागे आहे. मात्र याबाबत विज्ञानाकडेही ठाम अशी माहिती नाही. नक्की कुठल्या स्वभावाची माणसे व्यसनी होतात याबाबत ठामपणे सांगता येत नाही. काही संकेत जरूर मिळतात.

याबद्दल बोलण्याआधी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे एखादी जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे स्वभावदोष दूर होत नाही. त्यावर दीर्घकाळ चिवटपणे काम करावे लागते. निरनिराळे उपाय योजावे लागतात. आणि त्यासाठी मूळात तुमच्यात हा दोष आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे स्विकारावं लागतं आणि तसा स्विकार केल्यावर आपल्याला आपला दोषपूर्ण स्वभाव बदलायचा आहे यासाठी मनात प्रामाणिक तळमळ असावी लागते.

मी वर दोन वेळा “प्रामाणिक’ हा शब्द वापरला आहे त्याला कारण आहे. माणसे बोलताना अनेक गोष्टी बोलतात, मान्य करतात पण करायची वेळ आली की एकतर ढेपाळतात किंवा अगदी विरुद्ध कृती करतात. म्हणूनच व्यसनमुक्ती हवी असेल तर मनापासून स्विकार आणि कृतीला महत्त्व आहे.

आपला
अतुल ठाकुर
७ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.


फक्त आजचा दिवस – ८ – फुशारक्या मारणारी माणसे

नमस्कार

आपण स्वभावदोषांवर बोलत आहोत. आणि त्याबद्दल काही संकेत मिळतात असंही मी काल म्हटलं होतं. जी माणसे बढाया मारत असतात, फुशारक्या मारत असतात ती व्यसनाकडे वळण्याची शक्यता जास्त असते असे एक निरिक्षण आहे. व्यसनात बुडालेली माणसे तर अनेकदा बढाया मारताना दिसतात. समाजात एखाद्याबद्दल असे बोलले जाते की हा माणूस लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशा वृत्तीचा आहे. किंवा डॅशिंग आहे, डेरींगबाज आहे. व्यसनी माणसांमध्ये अशी वृत्ती अनेकदा आढळते.

कारण पुढे हा तथाकथित डॅशिगबाज डेरींगबाज स्वभाव फक्त खोटे बोलणे, बायकांवर हात उचलणे, व्यसनात लपवाछपवी करणे, समारंभात जाऊन शीतपेयांच्या बाटलीत दारु नेऊन पिणे असेच पराक्रम करण्यात वाया जाणार असतो. मला एका ज्येष्ठ माणसाने सुरेख उदाहरण दिले होते. ते म्हणाले समजा रस्त्यावर खुप ट्रॅफिक आहे तर समजुतदार माणसे नेमस्त विचार करुन गाडी हळू चालवतील. पण ही तथाकथित डॅशिंग माणसे काना कोपर्‍यातून गाडी काढतील, वेग वाढवतील आणि इष्ट स्थळी पोहोचल्यावर बढाया मारतील.

आपला
अतुल ठाकुर
८ सप्टेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...