व्यसन हे व्यसन असतं. त्यामुळे माझ्यापेक्षा तो वाईट परिस्थितीत आहे अशा तर्हेची तूलना करण्यात अर्थ नसतो. इतरांची परिस्थिती पाहून काही निष्कर्ष जेव्हा माणूस काढायला जातो तेव्हा अनेकदा कळत नकळत तो स्वतःला अनुकूल असलेलेच निष्कर्ष काढून मोकळा होतो. त्याचे विचार साधारणपणे असे चालतात. “तो जे सांगतो आहे ते सर्व ठीक आहे पण माझी परिस्थिती त्याच्याइतकी वाईट नाही. मी लवकर रिकव्हर झालो. मी रस्त्यावर दारु पिऊन पडलो नाही. माझी तब्येत त्याच्याइतकी खराब नाही. माझ्यात अहूनही ताकद आहे. मला व्यसनामुळे त्या अमक्या अमक्यासारखे रोग लागलेले नाहीत.” असे विचार मनात येणे हे अतिआत्मविश्वासाचे लक्षण असु शकते.
कारण याच्या पुढची पायरी म्हणजे …”मग जर आपली परिस्थिती इतकी चांगली आहे तर एखादा पेग घ्यायला काय हरकत आहे” ही असते. थोडक्यात काय तर अशा तर्हेच्या अतिआत्मविश्वासाने माणूस धोका पत्करण्याचा सहजपणे विचार करतो आणि मग स्लिप आणि रिलॅप्स अटळ असते. व्यसनाच्या बाबतीत धोका पत्करण्याची इच्छा होणे हेच मुळी अतिआत्मविश्वास असल्याचे लक्षण आहे.
अतिआत्मविश्वासाच्या अशा आणखी काही लक्षणांवर आपण पुढे बोलुयात. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर
धन्यवाद 🙂









