परिणामांच्या दृष्टीने सर्व व्यसनं सारखीच असतात. सर्वांमुळे माणसाचे सर्व स्तरांवर नुकसानच होत असते. त्यामुळे जेव्हा माणुस तुलना करु लागतो तेव्हा त्याला आपली परिस्थिती ही इतरांपेक्षा वेगळी आहे असे वाटण्याची शक्यता असते. म्हणजे माझं काही इतरांसारखं नाही. मला माझ्या व्यसनाची कारणं माहीत आहेत. मला जरा वेगळ्या तर्हेचे उपाय आवश्यक आहेत. हे जे काही तुम्ही सांगत आहात ते मला उपयोगी पडणारे नाही. अशासारखे विचार हे अतिआत्मविश्वाचे द्योतक असु शकतात. कारण असा विचार करणार्या मंडळीना खोल मनात कुठेतरी “खरं म्हणजे आपण व्यसनी नाहीच. आपली समस्या इतरांच्या मानाने अगदीच शुल्लक आहे.” असं वाटत असण्याची शक्यता असते.
हा धोक्याचा कंदिल आहे हे लक्षात ठेवलेले बरे. आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला स्पेशल ट्रिटमेंटची गरज आहे. आपल्याला मनाचे सर्व कंगोरे आपल्याला ठावूक आहेत, आपले सर्व स्वभावदोष आपल्याला माहित आहेत. अशासारखे विचार पुन्हा पूढे बेफिकिरीकडे घेऊन जातात. आपल्याला व्यसन नाही अशासारखा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्ही उपचारांमध्ये मनापासून सहभागी होऊच शकणार नाही. त्यामुळे मग उपचार केंद्रात कितीही दिवस काढले तरी पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था होऊन बसेल.
अतिआत्मविश्वासाच्या अशा आणखी काही लक्षणांवर आपण पुढे बोलुयात. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर
धन्यवाद 🙂









