आति आत्मविश्वासाबद्दल आणखी बोलताना आपण काल पाहिलं की जेव्हा माणसाला फॉलोअपला जाण्याची गरज वाटत नाही, तेव्हा तसे विचार मनात येणे ही एक धोक्याची घंटा असु शकते. असं म्हणतात की तांब्या नेहेमी घासून ठेवला की लखलखीत राहतो. फॉलोअपला जाणे हे तांब्या घासण्यासारखेच आहे. आपली सोबराईटी लखलखीत राहण्यासाठी फॉलोअपची आवश्यकता आहे. फॉलोअप हे एक असं व्यासपीठ असतं जेथे तुम्ही मनातलं काहीही बोलु शकता आणि तुम्हाला कुणी हसतही नाही. कारण तेथे येणार्या सर्वांची समस्या सारखीच असते.
मनातलं सांगून आपला भार हलका करणे हे फॉलोअपचं महत्त्वाचं उद्दीष्ट आहेच, शिवाय तेथे अनेक वर्षे सोबर राहिलेली ज्येष्ठ मंडळी असतात. ही माणसे तुम्हाला मदत करायला, व्यसनमुक्तीच्या बाबतीत योग्य सल्ला द्यायला तत्पर असतात. शिवाय या सर्व गोष्टी नि:शूल्क असतात. निदान मुक्तांगणच्या फॉलोअप मिटींगमध्ये तरी शूल्क आकारले जात नाही. शिवाय फॉलोअपमध्ये आपल्याला समदु:खी मित्र मैत्रीणी भेटतात.
फॉलोअपच्या फायद्यांबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे फॉलोअप टाळणे हे स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. आता पुन्हा आपण आपली चर्चा अतिआत्मविश्वास या विषयाकडे वळवुयात. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर









