खोटे समाधान असण्याचा मुद्दा जरा सूक्ष्म आहे. अतिआत्मविश्वासाची ती एक महत्त्वाची खूण आहे असे मला वाटते. म्हणजे माणुस स्वतःच स्वतःला आपण पुर्ण रिकव्हर झाल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकतो. ते विचार साधारणपणे असे चालतात. “आता आपण व्यवस्थित उपचार घेऊन आलो आहोत. बरेच दिवस व्यसनापासून लांब राहिलो आहोत. म्हणजे व्यसनमुक्तीतला सर्वात कठीण भाग आपण पार पाडलेला आहे. आपले काम झालेले आहे.” अशा तर्हेचे विचार म्हणजे कळत नकळत स्लिप आणि रिलॅप्सकडे होणारी वाटचाल असु शकते.
याचा अर्थ माणसाने सतत आपली स्लिप तर होणार नाही ना अशा भावनेने अस्वस्थ राहावे असा मुळीच नाही. पण व्यसनाच्या बाबतीत संपूर्ण नि:शंक होता येत नाही कारण आयुष्यभर मोहाचे क्षण कधीही येऊ शकतात. व्यसनमुक्ती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. तेव्हा आपण संपूर्ण व्यसनमुक्ती साधली आहे, आपले काम संपले आहे असा समज करून घेऊ नये इतकाच मुद्दा आहे.
उद्या आपण अतिआत्मविश्वासासंबंधी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला घेऊयात. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर
२१ नोव्हेंबर २०२०









