अतिआत्मविश्वास वाटून आता आपले व्यसनमुक्तीचे काम झालेले आहे असे वाटू लागले की मनात पुढचे विचार येऊ लागतात. आता आपण इतके दिवस सोबर राहिलो. ही सोबराईटी साजरी केलीच पाहिजे. आता आपल्याला आत्मविश्वास आला आहे. स्वतःवर कंट्रोल आला आहे. आता आपण लिमिटमध्ये नक्की राहु शकतो. अशासारखे विचार मनात आल्यावर पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नसते. स्वतःचे यश साजरे करायला काहीच हरकत नाही. पण जे अतिआत्मविश्वास बाळगतात ते व्यसनमुक्ती साजरी करायलाही व्यसनाकडेच वळतात.
आणि पुढे स्लिप किंवा रिलॅप्स अटळ असते.
अतिआत्मविश्वास हा असा चोरपावलांनी मनात शिरतो आणि माणसाला उताराच्या वाटेला लावतो. काही वर्ष सोबर राहिल्यावर जेव्हा आपण आपल्या मेहनतीचं बक्षिस स्वतःला देऊ इच्छितो तेव्हा ते यश साजरे करण्याचे असंख्य मार्ग असु शकतात. ते यश कुटूंबाबरोबर साजरं करण्याइतकं सुख दुसरं नाही कारण तुमच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा असतो. आणि ते यश एखादा पेग घेऊन साजरं करावं असं वाटण्याइतकी मोठी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही कारण त्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर स्वतःच्या हाताने पाणी फिरवत असता शिवाय घरच्यांनी तुमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचीही माती करीत असता.
अतिआत्मविश्वासासंबंधीचे असे अनेक सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण पुढे चर्चेला घेणार आहोत. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर
२२ नोव्हेंबर २०२०









