फक्त आजचा दिवस – ८४ – अतिआत्मविश्वास आणि विचार करण्याची पद्धत

अतिआत्मविश्वास असल्यावर व्यसनापासून दूर राहिलेल्या माणसाचे विचार कसे चालतात ते पाहणे उद्बोधक ठरेल. ही माणसे स्वतःसाठी सारं काही सोपं आणि गोड गोड करून टाकतात. उदाहरण द्यायचं झालं तर हे लोक असा विचार करु शकतात की ही मी काही नवीन व्यसनी मंडळी पाहत आहे त्यांच्याइतकी माझी परिस्थिती वाईट नाही. मग मला व्यसनमुक्तीचा इतका विचार करण्याची गरज काय? खरं सांगायचं तर आपण मुळात व्यसनी तरी आहोत का?

आपली परिस्थिती इतकी वाईट नाही इथपासून ते आपण खरोखर व्यसनी अहोत का इथपर्यंत विचारांची गाडी येऊन ठेपली की पुढे स्लिप किंवा रिलॅप्सचा खड्डा आहे हे ओळखावे. कारण याच्या पुढचा विचार असतो आपण खरं तर व्यसनी नाही. आणि त्यामुळे एखादा पेग कधीतरी घेतला तर त्याचा इतका बाऊ करण्याची गरज नाही.

व्यसनी माणसाला मर्यादेत राहता येत नाही. आता आपल्याला कधीही व्यसन करता येणार नाही. असले सारे महत्त्वाचे मुद्दे अतिआत्मविश्वासामुळे हवेत उडून जातात आणि माणूस पुन्हा व्यसनाच्या तळाशी जातो.

अतिआत्मविश्वासासंबंधीचे असे अनेक सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचे आणखी मुद्दे आपण पुढे चर्चेला घेणार आहोत. तोपर्यंत  मंडळी फक्त  आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त  राहायचं  आहे हे   लक्षात   ठेवा.

आपला
अतुल ठाकुर
२३ नोव्हेंबर  २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...