अतिआत्मविश्वासाबद्दल बोलताना त्यातले बारकावे लक्षात घ्यावे लागतील. एखादे भयंकर श्वापद सावजाच्या मागावर असावे, त्याने पावलाचा जराही आवाज होऊ न देता मागून येऊन सावजाला धरून त्याचा घात करावा तसा अतिआत्मविश्वास व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणार्यांचा घात करतो. त्यामुळे यापुढील चर्चेत काहींना पुनरुक्ती म्हणजेच तोच तोच मुद्दा आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाही. बारकाईने लक्ष दिलं तर असं आढळून येईल की आपण अतिआत्मविश्वासाच्या एक वेगळ्या छटेबद्दल बोलत आहोत. अर्थातच अतिआत्मविश्वासाचा अभ्यास करताना एक पक्कं लक्षात ठेवावं लागतं की त्याच्या छटा कितीही असल्या तरी अंतिम परिणाम एकच असतो तो म्हणजे स्लिप किंवा रिलॅप्स.
जेव्हा आपण व्यसनी माणसाचा अभ्यास करतो तेव्हाही असे जाणवते की ते व्यसन सुरु राहण्यास व्यसनातला अतिआत्मविश्वास कारणीभूत झालेला असतो. अनेक शेयरींग्जमध्ये माणसे असं सांगतात की मला व्यसनाच्या दरम्यान सर्व काही कळतं असं वाटायचं. व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल केल्यावर आपल्याला याची गरज नाही, आपल्याला हे सारं माहित आहे असं वाटणारीही माणसे होती. आणि उपचार घेऊन बाहेर पडल्यावर आता आपल्याला सर्व माहित झाले आहे असं वाटणारी माणसे आहेत.
त्यामुळे अतिआत्मविश्वास हा व्यसनात काय आणि व्यसनमुक्तीत काय नेहेमी कळत नकळत डोकावू शकतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
आपला
अतुल ठाकुर
२५ नोव्हेंबर २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…









