फक्त आजचा दिवस – ८८ – सोबर असताना

व्यसनाच्या तळाशी जाऊन जेव्हा माणुस उपचारकेंद्रात दाखल होतो आणि उपचार घेऊन सोबर होऊ लागतो तेव्हा यश मिळाल्याची भावना निर्माण होते. त्यात गैर काहीच नाही. अनेक वर्षे व्यसनात वाया घालवलेली असतात. अमाप पैसा वाया गेलेला असतो. कुटुंब दूर झालेले असते. कदाचित नोकरीही गमवलेली असते. जेव्हा माणूस व्यसनमुक्तीच्या मार्गाने वाटचाल करु लागतो तेव्हा ही परिस्थिती हळूहळु का होईना पालटायला लागते. नोकरी लागते. पैसा येऊ लागतो. नातेवाईक मित्र जवळ येऊ लागतात. कुटूंबात प्रेम निर्माण होतं. अशावेळी आपण काहीतरी भरीव मिळाल्याची भावना निर्माण होत असते. फार मोठं यश आपण मिळवलं. कुठलंतरी मोठं पारितोषिक मिळवलं असं माणसाला वाटतं. आणि ते खरंच असतं. व्यसनाच्या तळाशी जाऊन पुन्हा वर येणे आणि गमावलेल्या गोष्टी परत मिळवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी माणसाचं कौतूक झालंच पाहिजे.

पण हे एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक होतं. पुढे माणसाच्या मनात वेगळेच विचार येऊ लागतात आणि सर्व हवा बिघडून जाते.

“आपल्याला सोबर राहणं हे जमलेलं आहे. आपल्याला सोबराईटीचं तंत्र उमगलेलं आहे. आता आपल्याला कुठलीही गोष्ट व्यसनाच्या तळाशी नेऊ शकणार नाही. आता आपण स्वतःवर ताबा ठेवू शकतो.” एकदा हे विचार मनात येऊ लागले की पुढची पायरी ठरलेली असते. “आपण स्वतःवर ताबा ठेवू शकतो मग एखाद पेगचा बाऊ कशाला करायचा? कुणाला कळणारही नाही. आपण स्वतःला कधीही कंट्रोल करु शकतो.” अशासारखे विचार मनात येणे म्हणजे व्यसनाच्या घातकीपणाबद्दल पूर्ण माहिती नसल्याचे लक्षण आहे. आणि हे स्वतःबद्दल अतिआत्मविश्वास असल्याचेही लक्षण आहे.

आपला
अतुल   ठाकुर
२७ नोव्हेंबर   २०२०
फक्त आजचा दिवस   आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...