फक्त आजचा दिवस – ९० – दोन टोकाच्या भावना

व्यसनात असताना अतिशय हतबलतेची भावना मनात असते. काहींना आपण व्यसनात खोल रुतत चाललो आहोत हे जाणवतं. पण व्यसनाने शरीर मनावर इतका जबरदस्त कबजा केलेला असतो की त्यावर त्याला स्वतःहून काही करता येत नाही. ही आत्यंतिक हतबलतेची भावना हे व्यसनी माणसाच्या विचारांचे एक टोक असते.

तर दुसर्‍या बाजूने व्यसनमुक्तीच्या वाटेवर जेव्हा माणुस चालु लागतो तेव्हा काहीजण दुसरे टोक गाठतात. व्यसनमुक्तीमुळे आयुष्याची गाडी हळूहळु रुळावर येऊ लागलेली असते. मनात वाटतं बस! हे असंच हवं होतं. शेवटी सर्व काही मार्गावर आलं. आपण काहीतरी मिळवलं ही भावना गैर नाही. कारण व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालून आपण खरोखरंच काहीतरी मिळवलेलं असतं. पण आपल्याला व्यसनमुक्तीत यश मिळु लागलं याचा अर्थ आपली रिकव्हरीची प्रक्रिया संपली असा होत नाही हे आवर्जून लक्षात घेणे आवश्यक आहे.

या टप्प्यावर ज्यांना अतिआत्मविश्वास असतो ती मंडळी व्यसनाच्या फसवेपणाकडे दुर्लक्ष करतात. व्यसनाचा घातकीपणा आता त्यांना पूर्वीसारखा भयंकर वाटत नाही. व्यसनातील धोका आता त्यांना तितकासा काळजीकरण्याजोगा वाटत नाही. कारण या मंडळींना स्वतःच्या संयमाबद्दल गैरवाजवी विश्वास वाटतो. आपला स्वतःवर ताबा आहे याची त्यांना खात्री असते. येथे त्यांच्या स्वभावातील अतिआत्मविश्वास त्यांच्या वर्तनात  डोकावू लागतो असे मला वाटते.

आपला
अतुल   ठाकुर
२९ नोव्हेंबर   २०२०
फक्त आजचा दिवस   आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...